औरंगाबाद- साध्या कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालये अथवा बँका सर्वसामान्यांची कशी अडवणूक करतात याचा प्रत्यय मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला. सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील ११० वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिक शाहूबाई चंद्रभान दळवी यांना हयात प्रमाणपत्रासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला गाठावा लागला. बँकेने पगार थांबविला, विनंत्या करूनही दिला नाही. देशासाठी लढलेल्या या वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकांचा प्रशासनाने केलेला छळ सामान्य माणसाच्या जिव्हारी लागणारा आहे.
सरकारी
कार्यालयात किती टोकाची अडवणूक चालते याचा प्रत्यय वारंवार येतो. अगदी साध्या
प्रमाणपत्रासाठी दलालांची मदत घ्यावी लागते. कर्मचारी अधिकारी वेगवेगळी
कारणे सांगून सर्वसामान्यांना चकरा मारावयास लावतात. सिल्लोड तालुक्यातील शिवना
येथील रहिवासी स्वातंत्र्यसैनिक शाहूबाई चंद्रभान दळवी यांचे अजिंठा येथील बँक ऑफ
हैदराबाद शाखेत खाते आहे. या खात्यावर स्वातंत्र्यसैनिकांचे मानधन दरमहा जमा होते.
गेल्या महिन्यातही त्यांचे मानधन बँकेत जमा झाले. मात्र बँक अधिकार्यांनी हयात
प्रमाणपत्र सादर करण्याची अट घातली, त्याशिवाय मानधन दिले जाणार नाही असे स्पष्ट सांगितले. एकशे
दहा वर्षांच्या आजीबाई बँकेत जाऊन आल्या तरीही बँक अधिकारी बधले नाहीत. हयात
प्रमाणपत्र कुठून आणावे असा सवाल केला तर अधिकार्यांने थेट जिल्हाधिकारी
कार्यालयाकडे बोट दाखवले. त्यामुळे शाहूबाईंचा मुलगा सुखदेव चंद्रभान दळवी त्यांना
जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळी
सात वाजताच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व मुलगा सुखदेव यांनी औरंगाबाद साठी एसटी
पकडली. अकराच्या सुमारास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या दुसर्या मजल्यावर सामान्य प्रशासन शाखा आहे. या शाखेत
पोहोचण्यासाठी शाहू बाईंना हाताला धरून मुलाला चांगलीच कसरत करावी लागली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य दरवाजापासून सामान्य प्रशासन विभागापर्यंत
जाण्यासाठी शाहूबाई तब्बल चार वेळा खाली बसल्या. त्यांना उठता येत नव्हते त्यांची
मुले कसेबसे हाताला धरून त्यांना उठवत होते. हयात प्रमाणपत्रासाठी ज्येष्ठ
स्वातंत्र्यसैनिकाचा असा छळ संताप आणणाराच आहे.
बँक नेहमी छळते :
सुखदेव दळवी
राष्ट्रीयीकृत
बँकांचा हा छळवाद नेहमीच त्रासदायक ठरतो, असे सुखदेव यांनी सांगितले. शाहू बाईंना डोळ्याने दिसत नाही, चालताही येत नाही, ११० वयमान आहे. अशा
परिस्थितीत बँकेने स्वतः घरी जाऊन खातरजमा का केली नाही असा सवाल उपस्थित होत आहे
अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चमूने सदर स्वातंत्र्यसैनिकांचा आदर ठेवत वेळेत
कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बँकेसह प्रशासनाच्या
बेदरकारपणावर सर्वत्र टीका होत आहे तर सर्वसामान्य संताप व्यक्त करीत आहेत.












